अंकिताची मृत्यूशी झुंज अपयशी

महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात ३ फेब्रुवारी रोजी एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून पेट्रोल टाकून पेटवलेल्या २४ वर्षांच्या शिक्षिकेचा सोमवारी सकाळी रक्तदाब कमी होऊन ह्रिदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये पुष्टी करण्यात आली की हिंगणघाट येथील जळीतकांडातील पिडीत अंकिताचा आज सकाळी ६.५५ मिनिटांनी मृत्यू झाला.

१० फेब्रुवारीला पहाटे ४ च्या सुमारास, पीडितेच्या मूत्रपिंडाचे काम व्यवस्थित होत नव्हते आणि रक्तदाब कमी होण्यामुळे रात्रीपासून व्हेंटिलेटरच्या सहाय्याने जास्तीत जास्त ऑक्सिजनसह देऊनदेखील रक्तातील रक्तातील ऑक्सिजनची पातळी खालावत होती. रूग्णाला त्वरित उपचार मिळावेत म्हणून ऑन-ड्यूटी डॉक्टर उपस्थित होते. सकाळी ६.३० च्या सुमारास तिला ब्रेडीकार्डिया झाला आणि दीर्घकाळापर्यंत शर्थीचे प्रयन्त करूनही, पीडिता पुन्हा जिवंत होऊ शकली नाही आणि सकाळी ६.५५ वाजता तिला डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले, ”असे रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या घटनेमुळे जनतेत संताप व्यक्त झाला होता. गृहमंत्री यांनी या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात चालविली जाईल अशी घोषणा करण्यात आली.

गेल्या सोमवारी सकाळी सातच्या सुमारास आरोपी विकेश नगराळे यांनी हिंगणघाट येथील बसस्थानकाजवळ मुलीवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयन्त केला होता असे वर्धाचे पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी सांगितले.

तेले म्हणाले की, गुन्हेगारीच्या ठिकाणी पळून गेलेल्या नागराळे याला नंतर टाकळघाट गावातून पकडण्यात आले आणि त्यांच्यावर आयपीसी कलम ३०७ आणि ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, “असे तेली यांनी सांगितले.

आतापर्यंत हाती आलेल्या बातमीसुनार आरोपी नागराळे याचे पीडितेवर एकतर्फी प्रेम होते आणि पीडितेने नकार दिल्यावर त्याने तिला पेट्रोल टाकून भर रस्त्यात जाळले. मुख्य म्हणजे आरोपी विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. तीन महिन्यांपूर्वीच पीडित मुलीच्या वडिलांनी नगराळेला आपल्या मुलीला त्रास देऊ नये असा इशारा दिला होता. परंतु त्या मुलीच्याकुटुंबीयांनी त्यावेळी नगराळेविरूद्ध कोणतीही पोलिस तक्रार दाखल केलेली नव्हती.

“अतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यु झाला.या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय.पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती.या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली.तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.” – खा. सुप्रिया सुळे

आज अंकिताच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी आरोपीला जोपर्यंत त्यांच्या ताब्यात देत नाहीत तोपर्यंत अंकिताचे अंतिम संस्कार करणार नाही असा इशारा दिला. ज्या प्रकारे आरोपीने पीडितेला जिवंत जाळले त्याच प्रमाणे आरोपीही जिवंत जाळावे अशी मागणी त्यांनी केली. निर्भया प्रकरणात झालेली दिरंगाई पाहता, आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी त्यांनी एका वृत्तवाहिनी समोर अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.

हिंगणघाटात कडकडीत बंद

अंकिताच्या आज झालेल्या मृत्यनंतर हिंगणघाट परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून आरोपीला जिवंत जाळावा अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पनवेलमध्ये महिलेला जाळून फासावर लटकावले

औरंगाबाद, वर्ध्यातील हिंगणघाट आणि आता पनवेल. पनवेलमधील दुन्द्रे गावात शारदा माळी या ५५ वर्षीय महिलेला मंगळसूत्र चोरीच्या आरोपातून जाळण्यात आले. आरोपींनी हि महिला जळत असतानाच तिला निघृणपणे फासावर देखील लटकवून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोंदीविल्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच या प्रकरणातील पाचही आरोपी फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

गेल्या ४ दिवसात महाराष्ट्रात ३ महिलांना जाळण्यात आल्याच्या घटना घडल्यापासून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

औरंगाबादच्या सिल्लोडमधील अंधारी गावात बिअर बार मालकाने पेटविलेलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून वर्धा जिल्ह्यातील एकतर्फी प्रेमातून पेटविलेली पीडित शिक्षिकादेखील मृत्यूशी झुंज देत आहे.