छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची शिवजयंती

शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती संपूर्ण भारतभरात प्रचंड उत्साहात साजरी होत असते.

आज बरेच जण छत्रपती शिवाजी महाराजांना आपले दैवत मानतात परंतु आपण त्यांना देवत्व देऊन त्यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतोय अस नाही वाटत का?

देव म्हटलं की तो त्याच्या तो त्याच्या दैवत्वाने काहीही करू शकणारा आणि कोणतेही रूप घेवून असुरांना मारणारा अशीच सर्वांची भावना असते.

परंतु माझा राजा हा स्वकर्तृत्वाने आणि स्वबळावर मोठा झाला आणि फक्त मोठा नाही झाला तर लोकांच्या मनावर ४०० वर्षानंतर देखील राज्य करत आहे. परंतु त्यामागची त्यांची प्रचंड मेहनत, त्याग हे सगळं आपण त्यांना दैवत्व देऊन विसरून जातो

आज आपल्याकडे अनेक देव देवता आहेत कोणी गणपतीला पुजितो कोणी शंकराला तर कोणी देवीलापण हा एकमेव राजा असा आहे की ज्याला फक्त भारतातील लोकच नव्हे तर संपूर्ण जगभरातील लोक मानतात.
शून्यातून सुरुवात करणारा आणि पाठी कोणाचाही पाठबळ नसताना केवळ आपल्या सवगड्यांच्या साथीत स्वराज्याची स्थापना करून फक्त लोकाग्रहास्तव सिंहासनावर बसणारा फक्त एकमेव म्हणजे शिवाजी राजा.

देवाजवळ देखील जे गुण नव्हते ते माझ्या राजांजवळ होते. आजदेखील त्यांच्यासारखा न्यायनिवडा करणं कोणाला शक्य होत नाही.

शिवाजी महाराज हे अतिशय शिस्तप्रिय होते आणि हीच शिस्त स्वराज्यातील प्रत्येक मावळ्यात होती. याउलट काही लोक त्याच राजाचं फोटो लावून कायदा मोडताना दिसतात. कालच एक भगवा झेंडा लावलेला बुलेटवाला नंबरप्लेटच्या जागी फक्त महाराजांचा फोटो लावून गाडी चालवत होता, आपलेच मावळे नियम मोडतना पाहून राजांना आनंद होईल का?

शत्रुपक्षातील रूपवान स्त्रीला आपली माता म्हणणारा आणि आपल्याच राज्यातील एका पाटलाचा स्त्रीचा अनादर केला  म्हणून हात-पाय तोडणारा एकमेव राजा.

ज्या राजाने आयुष्यभर कधी मुहूर्त, पंचांग आणि बुवाबजीला कधी थारा दिला नाही, त्याच्याच जयंतीच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा घालणे कितपत योग्य आहे.

ज्या राजाने आपलं अख्खं आयुष्य फक्त आणि फक्त स्वराज्य बांधण्यात खर्ची घातलं त्या राजाचे विचार ना घेता फक्त एक दिवस गाडीला भगवा झेंडा लावून जय भवानी जय शिवाजी ओरडत गावभर फिरून राजांच्या मनाला आनंद मिळेल का?

आज परदेशात शिकवताना शिवाजी महाराजांचा इतिहास मॅनेजमेंट गुरु म्हणून शिकवला जातो तिथे आपल्याच देशात त्याच्या जन्मतारखेवरून वाद होताना दिसतात.

शिवाजी राजांनी मायमराठीला राज्य कारभारात आणून तिला मोठी केली, त्याच मराठी भाषेच्या शाळा आज ओस पडत आहेत, ह्याला जबाबदार कोण?

कितीही मोठा बाका प्रसंग आला तरी न डगमगता मोठ्या धैर्याने त्याचबरोबर शांतचित्ताने आणि हुशारीने शत्रूशी कसं लढावं हे आपल्याला अफजल खानसोबत प्रतापगडावरील प्रसंगातून दाखवून दिलंय.

ज्यावेळी समुद्र परिक्रमा करणे अशुभ मानलं जायचं त्यावेळेस महाराजांनी स्वतःच आरमार निर्माण करून एका नव्या व्यापाराला चालना दिली. ह्यातून देखील आपण काही बोध घेतला पाहिजे. आज बरीच मराठी मुलं आणि खासकरून त्यांचे पालक आपल्या मुला-मुलींना नवीन काही उद्योग करायला प्रोत्साहन देणं तर दूरची गोष्ट आहे उलटपक्षी त्याला ना चा पाढा लावून मागे खेचतात.

अजून एक मुद्दा असा की ज्या राजाने कायम धर्मनिरपेक्षपणाने आपला राज्यकारभार केला, ज्या राज्यात जातीपातीला अजिबात स्थान नव्हते तिथे आम्ही त्यांना फक्त हिंदुत्व/मराठा म्हणून त्याचा संकुचित नाही करत का? महाराजांनी प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला स्वराज्यात तितक्याच मानानं वागवलं.

आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण एक पण करुया. फक्त एक दिवस शिवाजी महाराज्यांच्या नावाने फिरून जयजयकार करण्यापेक्षा कायमच त्यांच्या विचारांवर चालून एक नवीन भारत घडवूया

 2,844 total views,  4 views today

Share This :

Anand Sontakke

Anand Sontakke is a Masters in International Business having 10 years experience in field of Import-Export

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *