डॉ. प्रभाकर गांधी – गोरगरिबांचे डॉक्टर

Dr. Prabhakar Gandhi

३० मे ला अचानक डॉ. प्रभाकर गांधीच्या निधनाची बातमी आली आणि प्रत्येक पनवेलकरच्या डोळ्याच्या कडा पाणावू लागल्या. पनवेलकरांच्या रुग्णसेवेत जीवन अर्पण केलेल्या डॉ. प्रभाकर गांधी नामक महर्षी आज दोन वर्षापासून कॅन्सरशी झुंज देत वयाच्या ८२ व्या वर्षी आपल्यातून निघून स्वर्गलोकी रवाना झाले.

गोरगरिबांचे डॉक्टर

१९६२ पासून गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून ते कार्यरत होते एक-दोन नव्हे तर ५५ वर्षे पनवेलकरांच्या आरोग्यासाठी ते कार्य करत होते, गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक रुग्णाशी त्यांचे रुग्णांची घट्ट नाते होते.

मूळचे महाड येथील असलेल्या डॉक्टर प्रभाकर गांधी हे पनवेल येथे स्थायिक झाले. त्यांनी डॉक्टरकी व्यवसाय म्हणून नव्हे तर समाजसेवा म्हणून आयुष्यभर केली. गरिबांवर ते मोफत उपचार करत असत पनवेलच्या सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे.

पनवेल शहरात कापड गल्लीत असलेला त्यांचा छोटासा दवाखाना वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत फक्त गोरगरिबांच्या सेवेसाठी चालवत होते.

डॉ. प्रभाकर गांधी कोणतीही ठरवलेली फी घेत नसत, पेशंट देतील तेवढीच फी ते स्वीकारत, जर एखाद्या पेशंटची फी देण्याची अजिबात परिस्थिती नसेल तर त्याच्याकडून फी न घेता उलट त्यालाच आपल्या जवळीक पैसे देवून ते त्यांची मदत करत.

उगाचच औषधांचा मारा न करता जर आवश्यक असेल तरच ते औषध-गोळ्या देत, गरज नसल्यास फक्त बरे होईल म्हणून सांगत.

याविषयी बोलताना ते सांगत मी गरिबी पाहिलेली आहे, गरिबी अनुभवलेली आहे. माझ्या आयुष्यात गरिबांनी मला नेहमी साथ दिली आहे. त्यामुळे पैशा पलीकडे विचार करून मी हा दवाखाना सुरू केला आहे.

एखाद्या गरिबाकडे उपचार घेण्याकरता पैसे नसल्यास आपल्याकडे येणाऱ्या श्रीमंत रुग्णाला संबंधित गरीब रुग्णांच्या उपचाराचा खर्च उचलण्याची विनंती करत आणि त्यांच्याकडे येणारे पेशंट त्यांच्या शब्दाला मान देत, ती विनंती सहज मान्य करत.

खरे तर वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांना दवाखान्यात जाऊन बसण्याची कसली गरज नसतानाही मात्र मी चालतोय तोपर्यंत हा दवाखाना सुरू होत राहील असा निर्धार करून त्यांनी सुरू ठेवला होता. मी शिकलोय समाजामुळे त्यामुळे माझी बांधिलकी समाजाची आहे.

उत्तम वक्ते आणि लेखक

समाजवादी विचारसरणी असल्यामुळे आपले विचार प्रखरपणे मांडणे हा डॉक्टर गांधी यांच्या स्वभावातील गुण होता. ते उत्तम वक्ते आणि लेखक होते दैनिक किल्ले रायगड आणि साप्ताहिक कोकणसंध्या मध्ये त्यांनी अखंडपणे लिखाण केले. राजकारण, समाजकारण, अर्थकारण त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी दैनिक किल्ले रायगड मध्ये दोन हजारापेक्षा जास्त लेख लिहिले.

आजारपणामुळे शेवटचे काही महिने ते घरातच होते अखेरच्या श्वासापर्यंत ते आपल्या कार्याशी प्रामाणिक राहिले. त्यांनी दिलेल्या संस्काराचा आदर्श घेत त्यांची मुले डॉ. आशिष आणि डॉ ययाती त्याचबरोबर सून डॉ. समिधा गांधी हे सुद्धा सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहेत.

अशा या पनवेलमधील धन्वंतरीला आमची भावपूर्ण श्रद्धांजली.

 535 total views,  2 views today

Share This :

Anand Sontakke

Anand Sontakke is a Masters in International Business having 10 years experience in field of Import-Export

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *