पंढरीची वारी – आषाढी दिंडी

पाऊले चालती पंढरीची वाट

ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय!

आषाढ म्हटलं की पाहिले आठवते ती पंढरीची वारी… महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संतांच्या पालख्या वारीसाठी वेगवेगळ्या शहरातून पंढरपुरास पायी पायी रवाना होतात. वारीची ही परंपरा तेराव्या शतकाच्या आधीपासून अखंडितपणे चालू आहे. श्रीसंत ज्ञानदेवांचे वडील देखील वारीला जात असत.

यावर्षी आषाढी एकादशी शुक्रवार दिनांक १२ जुलै रोजी आली आहे. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी.

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी म्हणजे आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो.

महाराष्ट्रातील तसेच चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीसाठी पंढरपुरास शेगाव येथून प श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते आणि या पालख्यासोबत लाखो भाविक पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेने चालत असतात. वारीला जाणाऱ्या वारकरी भक्तांचा दिंडीचा सोहळा अत्यंत आनंदायी असतो. वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली.

वारी सोहळ्यातील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’. त्याचे दोन प्रकार आहेत
१) उभे रिंगण
२) गोल रिंगण

वारीसोहळ्यात तीन उभी आणि चार गोल रिंगणे होतात. त्यातील दोन रस्त्याच्या उजव्या तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात.त्यांतही दोन रिंगणे जेवणापूर्वी आणि दोन रिंगणे जेवणानंतर होतात.

उभे रिंगण पार पडण्यासाठी पताका धारक वारकरी, तुळशी धारक महिला, विनेकरी, पखवाज वादक, टाळकरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांग करून ज्ञानोबा तुकाराम.., भजनाचा ठेका धरून नामस्मरण करतात.

तर गोल रिंगण हे मोठ्या मैदानात केले जाते. पताकावाला पाहिले फेरी मारून रिंगणास सुरुवात करतो त्यानंतर मानाच्या मेंढ्यांचे रिंगण होते. डोक्यावरती तुळस व पाण्याची कळशी घेऊन महिलांनी रिंगण सोहळ्याला फेरी मारून वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विणेकरी, टाळ-मृंदुग वादकही देहभान हरपून रिंगण सोहळ्यामध्ये धावत होते. त्याचवेळी दिंड्यांचे भजन सुरू होते. त्यामुळे संपूर्ण परिसर हा संतांच्या गजराने नाहून निघाला. अश्वांनी रिंगण सोहळ्याला पाच फेऱ्या मारल्या की रिंगण सोहळा पूर्ण होतो. वारकरी आणि इतर मंडळी त्या अश्वाच्या पायाखालची माती आपल्या कपाळाला लावतात.

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडी उच्चार
विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल

असे म्हणत रिंगण पूर्ण होताच वैष्णवांनी विविध खेळ खेळण्यास सुरवात केली. फुगडी खेळण्यामध्ये वैष्णव, वारकरी दंग होतात.

सकाळच्या वेळी अभंग, दुपार जेवणानंतर हरिपाठ, गुरूपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग वारकरी म्हणतात. ठराविक वारांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात. सर्व दिंड्या एकच अभंग एकदम म्हणत नाहीत. प्रत्येक दिंडीत मात्र एका वेळी एकच अभंग ऐकू येतो.

दुपारी जेवणानंतर ज्ञानोबारायांचा ‘हरिपाठ’ म्हटला जातो. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामधील शेवटचे चरण ‘ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान | समाधी संजीवन हरिपाठ॥ ‘म्हटले जाते त्यावेळी दिंडी थांबते; त्याबरोबर पालखीही थांबते आणि दिंडीतील लोक उभे राहून ते चरण म्हणतात. तेथूनच भूमीला स्पर्श करून श्री माऊलीला वंदन करतात.

वारीकरी मजल – दरमजल करत पंढरपुरास आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर होतात.

आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरास लाखो भाविकांची गर्दी असते. या दिवशी वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. इतके दिवस ज्या विठ्ठलासाठी चालत आलो ते अखेर भेटल्याने आनंदी झालेले हे वारकरी उपवास करतात. शहरातही जे वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करुन मनोभावे विठ्ठलाची यथोचित पूजा करतात.

Share This :

Anand Sontakke

Anand Sontakke is a Masters in International Business having 10 years experience in field of Import-Export

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *