गुरुपौर्णिमा

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । 
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥

Gurupornima

आपल्याकडे गुरूंची तुलना साक्षात ब्रम्हा, विष्णू आणि महादेवांसोबत केली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत अनादी काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे.

आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा ‘व्यासपौर्णिमा’ असे म्हणतात.ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे.

भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे.व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ! महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे.

गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.

गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.

आज गुरु म्हणजे फक्त शिक्षक आणि अध्यामिक गुरु एवढंच मानलं जात, पण खरं तर गुरु हा कोणीही असू शकतो, तो कदाचित ५ वर्षाचा बालक असेल किंवा ८० वर्षाचा म्हातारा. आपल्याला ज्याकडून ज्ञान मिळते तो म्हणजे गुरु.

गुरूंमुळेच आपलं अंधकारमय जीवन प्रकाशमान होत असतं.गुरु आपल्याला विविध विषयांवर माहिती व ज्ञान देऊन आपल्या अस्थिर मनाला आपल्या ताब्यात ठेवण्यात आपली मदत करतात आणि या संसारात आपल्याला कायम मार्ग दाखवत असतात. गुरु हे फक्त विद्या देण्याचे काम करीत नाहीत, तर ते जीवनाच्या प्रत्येक वळणावर शिष्याला घडवत असतात.

भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.

सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Share This :
Anand h

Anand Sontakke

Anand Sontakke is a Masters in International Business having 10 years experience in field of Import-Export

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *